पुणे: डाळींब गाव (ता. दौंड) येथे माधी गणेश जन्मोत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. गुरुवार, दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी श्री शिवपार्वती गणेश मंदिर, डाळींब गाव येथे हा भव्य धार्मिक सोहळा संपन्न होणार असून परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

या जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात सकाळी ७ ते ८.३० या वेळेत अभिषेक व शेंदूर लेपन कार्यक्रमाने होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.४५ ते सायंकाळी ७.४५ या कालावधीत श्री गणेश जन्म प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रवचन समर्थ भक्त अर्पणा ताई परांजपे (पुणे) यांच्या मधुर वाणीने होणार असून भाविकांना घरबसल्या दर्शन व श्रवणाचा लाभ घेता यावा, यासाठी हा कार्यक्रम फेसबुक लाईव्हद्वारेही प्रसारित केला जाणार आहे.
दुपारी १२ ते १२.३० या वेळेत पाळणा व महाआरतीचा कार्यक्रम होणार असून यानंतर दुपारी १२.३० वाजता बाप्पांचा महाप्रसाद वाटप करण्यात येईल. त्याचवेळी श्री विठ्ठल वारकरी संस्था (विठ्ठलबन) यांच्या वतीने ह.भ.प. श्री अविनाश महाराज लोकुळे (ग्रामस्थ, डाळींब गाव) यांच्या नेतृत्वाखाली संप्रदायक भजनाचा कार्यक्रम सादर होणार आहे.

हा संपूर्ण कार्यक्रम श्री शिवपार्वती गणेश मंदिर, मु. पो. डाळींब गाव, ता. दौंड, जि. पुणे येथे, गणपत दरा – ढवळेश्वर मंदिराजवळ (ढवळगड) येथे पार पडणार आहे. गणेश भक्तांसाठी हा दिवस आध्यात्मिक आनंद व भक्तीमय वातावरणात साजरा होणार असून परिसरातील नागरिकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी कळविले आहे.