पुणे : खेळ हा केवळ विजयासाठी नसून व्यक्तिमत्त्व घडवण्याचे प्रभावी माध्यम आहे. प्रत्येक स्पर्धेत आत्मविश्वासाने सहभागी व्हावे. यश मिळाले नाही तरी निराश न होता पुन्हा प्रयत्न करणे हीच खरी जिंकण्याची भावना आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त संभाजीराव कांचन यांनी केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात आयोजित वार्षिक स्नेहवर्धन क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे होते.
यावेळी स्नेहसंमेलनाध्यक्षा प्रा. सुजाता गायकवाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शुभांगी रानवडे, कला विभाग प्रमुख डॉ. समीर आबनावे, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य धनाजी ठाकरे, क्रीडा समन्वयक प्रा. बंडू उगाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

संभाजीराव कांचन पुढे म्हणाले की, खेळाच्या प्रवासात यश-अपयश येतच असते. अपयशामुळे खचून न जाता त्यातून धडा घेत पुढे वाटचाल करणे आवश्यक आहे. सातत्य, मेहनत व आत्मविश्वास यांच्या बळावर यश निश्चित मिळते. क्रीडा क्षेत्र विद्यार्थ्यांना संघर्ष व जिंकण्याची वृत्ती शिकवते.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बोऱ्हाडे यांनी खेळातील शिस्तीचे महत्त्व सांगितले. नियमांचे पालन केल्याने खेळात पारदर्शकता, सौहार्द व संघभावना टिकून राहते. शिस्तबद्ध खेळातूनच सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास घडतो, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा ज्योत प्रज्ज्वलनाने झाली. खेळाडूंची शपथ संकेत भालेराव याने दिली, तर पंचांची शपथ प्रा. प्रतिक आढाव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. स्वागत व प्रास्ताविक प्रा. बंडू उगाडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अनुजा झाटे यांनी, तर आभार प्रा. रोहित बारवकर यांनी मानले.

दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धांत पहिल्या दिवशी सांघिक तर दुसऱ्या दिवशी वैयक्तिक क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी मुलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत कला विभागाने, तर मुलींच्या थ्रोबॉल स्पर्धेत विज्ञान विभागाने जेतेपद पटकावले. बुद्धिबळ (मुले) स्पर्धेत आर्यन उरसळ प्रथम व सुरज लडकत द्वितीय, तर बुद्धिबळ (मुली) स्पर्धेत पायल भिलारे प्रथम व अनुष्का शेवकर द्वितीय ठरल्या.