पुणे : शहरातील नदीपात्रांमध्ये काही ठिकाणी बेकायदेशीररीत्या राडारोडा, बांधकामातील मलवा व कचरा टाकण्याच्या घटना समोर येत आहेत. टिळक पुलाच्या शेजारी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून, यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नदीपात्रात अशा प्रकारे टाकण्यात येणाऱ्या राडारोड्यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बाधित होण्याची शक्यता आहे. परिणामी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे.

राडारोडा टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी २४ तास भरारी पथक नेमण्यात आले होते. मात्र संबंधित पथक सध्या काय कार्यवाही करत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे शहराची स्वच्छता धोक्यात आल्याची टीका नागरिकांतून होत आहे.
ज्या भागातून नदीपात्रात राडारोडा टाकण्यात आला, त्या क्षेत्रातील संबंधित आरोग्य निरीक्षक व बांधकाम निरीक्षक यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच राडारोडा अथवा कोणत्याही प्रकारचा कचरा टाकणाऱ्या व्यक्ती, ठेकेदार किंवा संस्थांवर तात्काळ दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी. आवश्यकतेनुसार गुन्हा दाखल करून संबंधितांवर कठोर शिक्षा करावी, अशीही मागणी पुढे येत आहे.
यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी सर्व वॉर्ड अधिकारी व संबंधित पालिका अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील नदीपात्रांची नियमित पाहणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ कारवाई करावी. गरज असल्यास सीसीटीव्ही, ड्रोन सर्व्हे तसेच विशेष पथक नेमून नियंत्रण ठेवण्याचेही सुचविण्यात आले आहे.
नदी स्वच्छता व संवर्धन ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत नागरिकांनीही अशा प्रकारची माहिती संबंधित क्षेत्रीय कार्यालयास तात्काळ कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.