पुणे : हवेली तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान उरुळी कांचन येथील मतदान केंद्र क्रमांक २ संपूर्ण तालुक्यासाठी विशेष आकर्षण ठरले . मतदारांना सकारात्मक, आनंददायी व स्मरणीय अनुभव मिळावा, या उद्देशाने या मतदान केंद्राचे नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सुशोभीकरण करण्यात आले होते. त्यामुळे हे मतदान केंद्र ‘युनिक मतदान केंद्र’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर हिरव्या झाडांच्या कुंड्यांनी सजावट करण्यात आली होती. मतदारांना केंद्रापर्यंत सहज व सुरक्षितपणे जाता यावे, यासाठी प्रवेशमार्गावर गालिचा अंथरण्यात आले होते. मतदान कक्षातील टेबल्सदेखील झाडांच्या कुंड्यांनी सजविण्यात आल्याने संपूर्ण परिसर स्वच्छ, प्रसन्न व मनमोहक वातावरण निर्माण करणारा ठरला. या पर्यावरणपूरक संकल्पनेमुळे मतदान केंद्राला एक वेगळीच ओळख मिळाली.

या मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकरी धाटणीची वेशभूषा परिधान करून ग्रामीण संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडविले. या अभिनव उपक्रमामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेक मतदारांनी या संकल्पनेचे मनापासून कौतुक करत समाधान व्यक्त केले.

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत, सुरळीत व पारदर्शक पद्धतीने पार पडली. मतदारांचा सहभाग वाढावा, यासाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या मतदान केंद्रासाठी झोनल अधिकारी मीरा टेकवडे, केंद्राध्यक्ष लक्ष्मण मेमाणे, मतदान अधिकारी लक्ष्मण लवांडे, अर्चना अल्हाट, मंगल चव्हाण, हराळे तसेच शिपाई हिरालाल जाधव यांनी उत्कृष्ट नियोजनातून काम पाहिले. या उपक्रमाची माहिती ग्राम महसूल अधिकारी प्रियांका सुंदर्डे यांनी माध्यम अधिकारी प्रा. योगेश हांडगे यांना दिली.

प्रशासन, निवडणूक कर्मचारी व मतदार यांच्या समन्वयातून हवेली तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्याचे नमूद करण्यात आले.

हा उपक्रम ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या वतीने पार पाडण्यात आला. यावेळी सदस्यांनी असंख्य झाडांचे सुशोभीकरण केले होते. ड्रीम युवा सोशल फाउंडेशन सदस्यांची ही संकल्पना ग्रामस्थांसाठी कौतुकास्पद ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *