पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत सरपंच मिलिंद जगताप यांना दोनशे ग्रामस्थांच्या सह्यांनी लेखी निवेदन दिल्यानंतरही निवासी मालमत्ता कर, घरपट्टी व इतर करांच्या थकबाकीवरील ५० टक्के सवलतीचा शासन निर्णय अद्याप अमलात न आणल्याने उरुळी कांचन ग्रामपंचायतीची भूमिका संशयास्पद ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. २९ रोजी ग्रामपंचायत सभागृहात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या ग्रामसभेत मागील सभेच्या कामकाजाचे प्रोसिडींग वाचून कायम करणे, ‘विकसित भारत—रोजगार व आजीविका हमी (ग्रामीण) : VB-G RAM G अधिनियम, २०२५’ अंतर्गत जनजागृती, सन २०२६-२७ साठी विकास आराखडा तयार करणे तसेच अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळचे विषय घेण्यात येणार आहेत.
दरम्यान, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत निवासी मालमत्ता कर, घरपट्टी व इतर करांच्या थकबाकीवर ५० टक्के सवलत देण्याचा स्पष्ट निर्णय शासनाने घेतला असून, त्यासंबंधीचा शासन निर्णय १३ नोव्हेंबर २०२५ रोजी (क्रमांक: व्हीपीएम-२०२५/प्र.क्र. ६२) जाहीर करण्यात आला आहे. हा निर्णय उरुळी कांचन ग्रामपंचायतीने तत्काळ मंजूर करावा, या मागणीसाठी माजी उपसरपंच रामदास तुपे व संदीप कांचन यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सह्याचे लेखी निवेदन दिल्याने पुन्हा एकदा ग्रामसभा घेण्यात येत आहे.
आजतागायत ग्रामपंचायतीकडून या सवलतीबाबत कोणतीही अधिकृत सूचना, नोटीस, जाहिरात, फ्लेक्स किंवा जनजागृती करण्यात आलेली नसल्याची खंत रामदास तुपे यांनी व्यक्त केल्यानंतर विशेष ग्रामसभेचे जाहीर नोटीस ग्रामस्थांसाठी जारी केली आहे.
नागरिकांनी थेट चौकशी केल्यानंतर “हा शासन निर्णय उरुळी कांचन ग्रामपंचायतीने नामंजूर केला आहे,” असे तोंडी उत्तर देण्यात आल्याचा दावा खातेदारांनी केला आहे. मात्र, या कथित नामंजुरीबाबत कोणताही लेखी आदेश, ठराव किंवा अधिकृत स्पष्टीकरण उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी होणाऱ्या विशेष ग्रामसभेत यावर स्पष्ट निर्णय होणार का, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
अन्यथा आंदोलन…..
सरकारने जर थकबाकीदरांना दिलासा द्यायचे ठरवले आहे तर ग्रामपंचायत उरुळी कांचनने पण लोकहिताचा निर्णय घ्यावा; अन्यथा ग्रामस्थांना बरोबर घेऊन ग्रामपंचायत पुढे आंदोलन घ्यावे लागेल. आधीच हा निर्णय घायला बराचसा उशीर झाला आहे.
अलंकार कांचन, सदस्य, जिल्हा परिषद नियोजन समिती
…….
एकमुखी आणि बहुमताने ग्रामसभेने ठराव मंजूर केल्यास ५० टक्के सवलत नक्की देऊ.
मिलिंद जगताप, सरपंच, उरुळी कांचन (ता. हवेली)
