पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका उद्या पार पडणार आहेत. गावागावात राजकीय तापमान वाढलं आहे. पण ही उष्णता रस्ते, पाणी, आरोग्य किंवा शिक्षण यावर नाही—ती आहे व्हॉट्सॲप स्टेटस, फेसबुक पोस्ट आणि पाकिटांच्या उष्णतेवर!
कालपर्यंत “नेटवर्क नाही” म्हणून गायब असलेले उमेदवार आज अचानक सर्वत्र दिसू लागले आहेत.
कोणी कवी झालाय, कोणी समाजसेवक, तर कोणी “मी जन्मापासूनच जनतेसाठीच झटतोय ” असं भावूकपणे सांगतोय.

“मी तुमचाच आहे”, “एक संधी द्या, गाव बदलून टाकीन”
अशा पोस्ट्स इतक्या येतायत की मतदारही गोंधळात— मत द्यायचं की डोळे पुसायचे?
स्क्रीनवर भावना ओसंडून वाहत असताना,
ग्राउंडवर मात्र “चहाला येतो” असं सांगून रात्री-अपरात्री होणाऱ्या भेटींच्या चर्चा रंगात आहेत.
चहा थंड होईपर्यंत टेबलाखाली काहीतरी गरम सरकतं—अशी कुजबुज गावागावात ऐकू येतेय.

काही ठिकाणी तर मतदार यादीच “शॉपिंग लिस्ट” म्हणून वापरली जात असल्याच्या अफवा जोरात आहेत.
कोणाकडे किती मतं, किती वजन, किती दर—सगळं अगदी प्लॅनिंगमध्ये!
सोशल मीडियावर जुने फोटो, नाटकी किस्से आणि स्वतःच्याच कर्तृत्वाच्या “ब्लॉकबस्टर कथा” पोस्ट होतायत.
पाच वर्षं कुठे होते याचा ट्रेलर कुठेच नाही,
पण निवडणुकीच्या वेळी मात्र फुल्ल HD सिनेमा रिलीज!
नागरिक म्हणतात,
“पैसा फेका, मत घ्या आणि नंतर पाच वर्षं ‘लास्ट सीन’सारखे गायब व्हा”—
हीच जुनी स्क्रिप्ट पुन्हा एकदा रीरनवर आहे.
लोकशाहीचा उत्सव म्हणवली जाणारी निवडणूक
जर भावनिक ड्रामे आणि पाकिटांच्या जोरावर जिंकली जाणार असेल,
तर सामान्य मतदारांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर?