पुणे :१ जानेवारी २०२६ रोजी मौजे पेरणे येथे होणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या लक्षावधी अनुयायांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर विजयस्तंभ परिसराची सखोल पाहणी करण्यात आली. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार तसेच महाराष्ट्र राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक निखिल गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली ही पाहणी झाली.
यावेळी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने उद्भवू शकणाऱ्या संभाव्य प्रश्नांबाबत आयोजक, स्थानिक ग्रामस्थ तसेच संबंधित यंत्रणांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. बंदोबस्त, वाहतूक नियोजन, आपत्कालीन सेवा, तसेच गर्दी नियंत्रण याबाबत अधिकाऱ्यांनी आवश्यक सूचना दिल्या.
“यंदाचा शौर्य दिन सोहळा शांततेत, निर्विघ्नपणे आणि कोणत्याही तणावाविना पार पडेल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता १ जानेवारी रोजी अभिवादनासाठी मोठ्या संख्येने यावे,” असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी केले.
या पाहणीदरम्यान पुणे सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, संदीप भाजीभीकरे, हिम्मतराव जाधव यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून, शांतता व सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
