पुणे : येथील महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘मणिफेस्ट २०२६’ निमित्त ‘ट्रॅडिशनल डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त संभाजीराव कांचन यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवत विविध पारंपरिक पोशाख परिधान केले. नऊवारी व पैठणी साड्या, धोतर-कुर्ता, फेटे, कुडते, पारंपरिक दागिने, पगड्या तसेच ग्रामीण वेशभूषेत विद्यार्थ्यांनी मंचावर सादरीकरण करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मराठमोळ्या परंपरेचा अभिमान जपत सादर करण्यात आलेल्या या वेशभूषेमुळे संपूर्ण महाविद्यालय परिसरात उत्साहपूर्ण व सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे, स्नेहसंमेलनाध्यक्षा व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. सुजाता गायकवाड, कला विभागप्रमुख डॉ. समीर आबनावे, संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. वैशाली चौधरी यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ट्रॅडिशनल डे स्पर्धेत प्रथम क्रमांक चौधरी मुस्कान आणि ग्रुप (द्वितीय वर्ष वाणिज्य), द्वितीय क्रमांक टायगर ग्रुप (द्वितीय वर्ष वाणिज्य) तर तृतीय क्रमांक शहानवाज कंचोडी आणि ग्रुप (द्वितीय वर्ष संगणक) यांनी पटकावला. रोहन पात्रे (प्रथम वर्ष कला) याला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हर्षल भोसले यांनी केले. परीक्षक म्हणून डॉ. निलेश शितोळे, प्रा. अनुप्रिता भोर व प्रा. अंजली शिंदे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक प्रा. सारिका ढोणगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक, कार्यालयीन सेवक व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.