महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा वेदिका होळकर यांचे प्रतिपादन

पुणे : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये महिला सक्षम सक्षमीकरण होणे गरजेचे असून महिलांना त्यांचे हक्क, कर्तव्य व जबाबदाऱ्या समजल्या जाव्यात या दृष्टिकोनातून शासनाने ठोस पावले उचलली आहेत. महिला वर्ग हा महिला संघटन करण्यात मागे नसल्याचे एकंदरीत दिसून येत आहे.

याचाच एक भाग म्हणून माणुसकी सामाजिक फाउंडेशनच्या वतीने निफाड येथे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम माणुसकी सामाजिक फाउंडेशनच्या सचिव आरती निकाळे व प्रियदर्शनी निकाळे यांनी आयोजित केला होता.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लासलगाव महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा वेदिका जयदत्त होळकर, पिंपळगाव नजिकच्या उपसरपंच मेघा दरेकर, माया होळकर, कविता चव्हाण, मनीषा वाघ उपस्थित होत्या.

हळदी कुंकू म्हणजे महिलांच्या आदर-सन्मानाचे प्रतीक असून यामध्ये सर्वच महिलांचा सहभाग महत्त्वाचा असतो. एकल महिला, विधवा महिला तसेच सर्व स्तरातील व घटकांतील महिलेकडे फक्त ती एक स्त्री म्हणून पाहिले जाते. माणुसकी व आपुलकीच्या नात्यातून सामाजिक ऋणानुबंध कायम राहावेत, या भूमिकेतून महिलांना एकत्र आणून सामाजिक सलोखा जपण्याचा क्षण म्हणजे हळदी कुंकू समारंभ असून तो महिलांच्या सौभाग्याचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा वेदिका जयदत्त होळकर यांनी केले.

लोकमान्य टिळकांनी समाजजागृतीसाठी माणसं एकत्र आली पाहिजेत, त्यासाठी निमित्त लागते, या विचारातून गणेशोत्सव व शिवजयंतीचे औचित्य साधले. त्याचप्रमाणे हाच विचार मनाशी बाळगून माणुसकी सामाजिक फाउंडेशनच्या वतीने निफाड येथे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महिलांचे संघटन व उपक्रमशील नियोजन महत्त्वाचे असून ते महिलांना सामाजिक व मानसिक आधार देते. महिला ही राष्ट्राची सर्वोत्तम शक्ती आहे. मात्र ती स्वतः दुर्लक्षित राहिली, प्रवाहाबाहेर राहिली तर तिचा दर्जा समतेचा राहत नाही. महिलांसाठी कुंकू हाच खरा दागिना असून तो प्रत्येकाने जपला पाहिजे. याचा अर्थ प्रत्येक भगिनीने आपल्या पतीसोबत आपली परिपूर्ण भूमिका पार पाडली पाहिजे, जशी भूमिका राष्ट्रमाता जिजाऊंनी पार पाडली, सावित्रीमाईंनी ज्योतिबा फुलेंसोबत पार पाडली आणि रमाईने बाबासाहेब आंबेडकरांसोबत पार पाडली, असे मत महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा वेदिका होळकर यांनी यावेळी मांडले.

याप्रसंगी उपस्थित महिलांना गृहउपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. कार्यक्रमास लीलावती वाघ, रूपाली पाटील, वर्षा कांगणे, माधुरी दराडे, वैशाली जावरे, आशा भुसे, किरण सोनवणे, प्राची अस्वले, शीतल भवर, वैशाली जाधव, निर्मला शिंदे, माया परिहार, सरला बोराडे, अश्विनी मोगल, रीना परदेशी, विजया बागुल आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *