पुणे : हिंजवडी पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या २०१४ सालच्या खून प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर येथील मा. न्यायाधीश एस. डी. कुलकर्णी यांनी आज महत्त्वपूर्ण निकाल दिला. सेशन केस क्रमांक २०३/२०१५ मधील आरोपींपैकी दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३८/२०१४ अंतर्गत भा.द.वी. कलम ३०२, २०१, १२०(ब) तसेच आर्म्स अॅक्ट कलम ३(२५) अंतर्गत हा खटला चालू होता. या प्रकरणातील आरोपी शाहरुख उर्फ पाप्या रशीद शेख (क्र. २) आणि प्रकाश अण्णा डोंगरे (क्र. ५) यांना खूनाच्या गुन्ह्यात दोषी धरत न्यायालयाने जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
दंड न भरल्यास दोन महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत ३ वर्षांचा कारावास व २ हजार रुपयांचा दंडही सुनावण्यात आला असून सर्व शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत.

दरम्यान, आरोपी सचिन सुदाम कुदळे (क्र. १) हा मयत झाला असून उर्वरित आरोपी गौतम श्रीराम मोरे (क्र. ३), बाबू जनार्धन मुजुमले (क्र. ४) आणि विशाल तानाजी कुदळे (क्र. ६) यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या प्रकरणाचा तपास हिंजवडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्ही. व्ही. खुळे यांनी केला होता. सरकारी बाजू विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. रमेश घोरपडे यांनी मांडली.
या कारवाईत पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच न्यायालयीन कर्मचारी यांचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले.
दरम्यान, मुळशी तालुक्यातील पुनावळे येथील माळवाडी परिसरात १८ ऑक्टोबर २०१४ रोजी रात्री झालेल्या गोळीबारात राजेश सखाराम दर्शले (४६) यांचा मृत्यू झाला होता. ते ४१-इस्टेरा बांधकाम साईटसमोर बसले असताना आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वैयक्तिक वाद व बांधकाम व्यवसायातील वर्चस्वाच्या कारणातून हा प्रकार घडल्याचे तपासात उघड झाले. सचिन कुदळे व इतर आरोपींनी संगनमताने कट रचून पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. आरोपी मोटारसायकलवरून फरार झाले होते.