पुणे : पुणे–सोलापूर महामार्गावर कोरेगावमुळ गावच्या हद्दीत अमर रोज नर्सरीसमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १५) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत सचिन रामराव कडवळे (वय ४७, व्यवसाय शेती, रा. कडवस्ती, कोरेगावमुळ, ता. हवेली, जि. पुणे) यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगावमुळ गावच्या हद्दीत पुणे–सोलापूर महामार्गाच्या कडेला अमर रोज नर्सरीसमोर एका अनोळखी इसमास अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात त्या व्यक्तीस किरकोळ तसेच गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.

या प्रकरणी गुन्हा क्रमांक ६०/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१), १२५(ब), १२५(अ) तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४/१७७ अन्वये अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास उरुळी कांचन पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *