पुणे: उरुळी देवाची नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुरसुंगी परिसरात मतदारांना दारू वाटप करून निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने उधळून लावला. एका उमेदवाराच्या मुलासह दोन जणांना दारूची वाहतूक करताना रंगेहाथ पकडण्यात आले असून, चारचाकी वाहनासह सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

ही कारवाई सोमवारी (ता. १५) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी ग्रामपंचायत हद्दीतील शिवम हॉस्पिटलजवळ करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकातील सदस्य सुहास रामचंद्र गवळी हे कर्तव्यावर असताना पुणे–सोलापूर महामार्गावरून फुरसुंगीकडे येणाऱ्या टाटा नेक्सॉन ईव्ही (क्र. एम.एच. १२ वाय.एल. ७१७३) या चारचाकी वाहनाची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान वाहनाच्या डिकीत रॉयल स्टॅगसह विविध विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणी वेदांत राहुल कामठे (वय १९, रा. पांडवदंड, फुरसुंगी) आणि आकाश तुकाराम मुंडे (वय २४, रा. शिवम हॉस्पिटल शेजारी, तरवडी, फुरसुंगी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

दारूसंदर्भात विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे न दिल्याने तसेच अवैधरीत्या दारू बाळगून वाहतूक केल्याचे निष्पन्न झाल्याने ही माहिती तात्काळ फुरसुंगी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच फुरसुंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दारूसाठ्यासह संबंधित कार असा सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दोन्ही आरोपींविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ६५ (अ) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास फुरसुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार करपे करत आहेत.

निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन देण्याचे प्रकार रोखण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथके, भरारी पथके आणि पोलिस यंत्रणा सतर्क असून, कोणत्याही प्रकारचा आचारसंहिता भंग खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. निष्पक्ष, निर्भय आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *