पुणे : उरुळी कांचन–सोरतापवाडी जिल्हा परिषद गटातील मतदानाची आकडेवारी समोर येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकूण १३५०८ मतदारांपैकी ७,१६४ महिला आणि ६,३४४ पुरुष मतदारांनी मतदान करत ५२.८१ टक्के सरासरी मतदानाची नोंद केली आहे. या आकडेवारीवरून ग्रामीण भागात राजकीय जाणीव वाढत असल्याचे चित्र स्पष्ट होत असले, तरी काही केंद्रांवरील कमी मतदान हे चिंतेचे कारण ठरत आहे.

या गटातील २६ मतदान केंद्रांपैकी केंद्र क्रमांक २३ आणि २४ येथे सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे ६२.२४ व ६२.४६ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे या केंद्रांवर महिला मतदारांचा सहभाग लक्षणीय ठरला आहे. यामुळे महिलांची निर्णायक भूमिका आगामी निकालात महत्त्वाची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मात्र, दुसरीकडे केंद्र क्रमांक ३, ८ आणि १६ येथे ४६ टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाल्याने राजकीय पक्षांच्या प्रचारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘ मतदार उदासीनता की स्थानिक नाराजी?’ असा सवाल उपस्थित होत असून, याचे उत्तर निकालातूनच मिळणार आहे.

काही केंद्रांवर पुरुष मतदारांची संख्या महिलांपेक्षा जास्त असली, तरी एकूण चित्र पाहता महिला मतदारांनी पुरुषांपेक्षा अधिक मतदान करत आघाडी घेतली आहे, ही बाब विद्यमान सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. कारण ग्रामीण राजकारणात महिलांचा कौल अनेकदा निकालाची दिशा बदलतो.
एकूणच उरुळी कांचन–सोरतापवाडी जिल्हा परिषद गटात मतदान झाले असले तरी ते समाधानकारक म्हणावे इतके नाही. आता या मतदानातून नेमका कुणाचा विजय होणार, सत्ताधाऱ्यांचा गड टिकणार की विरोधकांना संधी मिळणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.