पुणे : वानवडी पोलिस ठाणे हद्दीत गावठी हातभट्टी दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत ११५० लिटर हातभट्टीची दारू व वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ५ लाख ६५ हजार ५०० रुपये आहे.
दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी वानवडी पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक व तपास पथक पोलिस हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार दया शेगर व अमोल पिलाणे यांना गुप्त बातमी मिळाली. महिंद्रा कंपनीच्या टेम्पोमधून हातभट्टीची गावठी दारू वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रचला.
सोपानबाग–घोरपडी परिसरात संशयित टेम्पो (एम.एच.१२ एस.एक्स. ४६६८) अडवून तपास केला असता वाहनात चार इसम आढळून आले. त्यामध्ये लियाकत रोहीत अब्बासी, (वय ३२ वर्षे, धंदा दारु विक्री, रा. स.नं. ६६. ढोबरवाडी, रेल्वे पटरीच्या बाजुला, सोपानबाग, पुणे), श्रीकांत बापु साबळे, (वय-२१ वर्षे, धंदा टेम्पो चालक, रा. सोरतापवाडी फाटा, पुणे) संकेत विजय पाबळे, (वय १९ वर्षे, रा. हेल्पर, रा. महादेवनगर, सोरतापवाडी, ऊरळी कांचन, पुणे), विशाल दुर्योधन संगोडिया, (वय १८ वर्षे, रा. गाडामुडी गाव, खामगाव फाटाजवळ, यवत, पुणे) यांचा समावेश आहे.
टेम्पोची झडती घेतली असता काळ्या व निळ्या रंगाच्या प्लास्टिक कॅनमध्ये भरलेली एकूण ३३ कॅन (प्रत्येकी ३५ लिटर) अशी ११५० लिटर तयार हातभट्टीची गावठी दारू आढळून आली. ही दारू कुंड्या व झाडांच्या आडोशाने लपवून वाहतूक केली जात असल्याची कबुली मुख्य आरोपी लियाकत अब्बासी याने दिली.

या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२०/२०२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख करीत आहेत.
ही कारवाई पोलिस उप-आयुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलिस आयुक्त नम्रता देसाई, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख व वानवडी पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने केली.