पुणे : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका गोदामातून ५४ लाख ५३ हजार रुपयांच्या सिगारेट चोरीप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शंभरहून अधिक सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून पोलिसांनी ही कारवाई केली. या गुन्ह्यातील दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
प्रथमेश ज्ञानेश्वर चव्हाण (रा. वाघोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसीतील संबंधित गोदामात सिगारेट, बिस्किटे, साबण यांसारखा माल साठवून ठेवण्यात येतो. हा माल दररोज मालवाहू वाहनांद्वारे डिलरकडे पाठविला जातो.
१७ डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गोदामात उभ्या असलेल्या मालवाहू पिकअपमध्ये भरलेला माल घेऊन चोरट्याने चलनाची नोंद करत गेटवरून वाहन बाहेर काढले आणि पलायन केले. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या सूचनेनुसार तपासासाठी विशेष पथके नेमण्यात आली.
पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात चोरीसाठी वापरलेले वाहन काही अंतरावर सोडून देण्यात आल्याचे दिसून आले. पुढे सिगारेट दुसऱ्या वाहनातून नेण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान वाघोली परिसरात एक संशयित वाहन आढळून आले. चौकशीत प्रथमेश चव्हाण याने दोन साथीदारांना चोरीसाठी वाहन दिल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीचा माल आणि मालवाहू वाहन असा एकूण ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात यांच्यासह दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर, माणिक काळकुटे व अमोल रासकर यांनी केली आहे.
