पुणे: उरुळी कांचन (ता. हवेली) येथील दत्तवाडी परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पाण्याची पिंप तसेच खाऊ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अनिल कदम यांनी शाळेला सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक असून, उन्हाळ्याच्या काळात विद्यार्थ्यांना पाण्याची अडचण भासू नये, या उद्देशाने पाण्याची पिंप शाळेस देण्यात आली. यासोबतच लहान विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला.

कार्यक्रमावेळी अध्यक्ष अनिल कदम यांनी शिक्षणाबरोबरच आरोग्य व स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. “ विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने हातभार लावला पाहिजे. शाळा ही संस्कारांची पहिली पायरी असून, अशा छोट्या उपक्रमांतून मोठा बदल घडू शकतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी शिवाजी कांचन, एकनाथ ताम्हणे, शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता कुदळे, खेडेकर मॅडम व मधुकर यांची उपस्थिती होती. मुख्याध्यापिका संगीता कुदळे यांनी संस्थेच्या या उपक्रमाबद्दल आभार मानत, अशा सामाजिक उपक्रमांमुळे शाळेच्या गरजांना हातभार लागतो आणि विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळते, असे सांगितले.

कार्यक्रम शांततेत व आनंदी वातावरणात पार पडला. ग्रामस्थ व पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या हितासाठी असेच उपक्रम राबविण्याचा मानस बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *