पिंपरी : महाराष्ट्रातील विशेषतः पुणे जिल्ह्यातील औद्योगिक परिसर कोरियन गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत असून ऑटोमोबाईल व उत्पादन क्षेत्रात उद्योग उभारणीसाठी ते सकारात्मक असल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकत्याच झालेल्या संयुक्त परिसंवादात ४० पेक्षा अधिक कोरियन कंपन्यांनी जमीन खरेदीसाठी उत्सुकता दर्शवली असून एमआयडीसीच्या धोरणांनाही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), कोरिया एसएमइज अँड स्टार्टअप एजन्सी (कॉस्मे) आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठ यांच्या वतीने पुण्यातील हॉटेल ऑर्चिड येथे हा परिसंवाद पार पडला. यावेळी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांनी सांगितले की, लवकरच गुंतवणूक प्रक्रियेसाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात येणार असून भारत–कोरिया उद्योग सहकार्याला अधिक गती मिळेल.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टने स्थापन केलेले “पीसीयू-कोरिया फॅसिलिटेशन सेंटर” हे उद्योग, कौशल्य विकास आणि संशोधन यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या केंद्रामार्फत उद्योग सहकार्य, कौशल्यविकास आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या तीन प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

डॉ. गिरीश देसाई यांनी प्रास्ताविकात सांगितले की, कोरियन कंपन्या, एमआयडीसी अधिकारी आणि विविध भागधारकांना एकत्र आणण्यात पीसीयूने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विद्यापीठ इंटर्नशिप, संशोधन प्रकल्प आणि उद्योग–शिक्षण सहकार्य वाढवण्यासाठी कटिबद्ध असून कोरियन भाषा प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांसाठी जागतिक संधी निर्माण केल्या जात आहेत.

या परिसंवादात कोरियन वाणिज्य दूत, उद्योग प्रतिनिधी तसेच विविध कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. अशा प्रकारचे संवाद सत्र दर तीन महिन्यांनी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे पुणे औद्योगिक क्षेत्र कोरियन गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र म्हणून अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *