पुणे: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबतचा संभ्रम आता लवकरच दूर होण्याची शक्यता आहे. राज्यातील ३२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी डिसेंबरच्या अखेरीस राज्य निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पूर्वी राज्यातील सर्व प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याने आयोगावर वेळेचे मोठे दडपण आहे.
महापालिका निवडणुकांसोबतच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचाही धुरळा उडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस किंवा येत्या सोमवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सात दिवस उमेदवारी अर्ज स्वीकृतीसाठी दिले जातील. त्यानंतर दोन दिवस अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. छाननीनंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार असून २८ ते २९ जानेवारीदरम्यान मतदान होऊन त्याच सुमारास निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. ३१ जानेवारीपूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा आयोगाचा मानस आहे .
दरम्यान, नगरपरिषद निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत चर्चा अधिक तीव्र झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार दिलीप वळसे पाटील यांनी येत्या चार ते आठ दिवसांत जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होईल, असा दावा केला आहे. मंचर येथील शेवाळवाडीमध्ये विकासकामांच्या उद्घाटनावेळी त्यांनी संभाव्य तारखांबाबत संकेत दिले. यापूर्वी नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा त्यांनी अचूक सांगितल्याने त्यांच्या विधानाला राजकीय वर्तुळात महत्त्व दिले जात आहे.
राज्यातील रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, नांदेड, बीड, अहमदनगर आणि अमरावतीसह अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांतील जिल्हा परिषद निवडणुका प्रलंबित आहेत. महिनाअखेरीस ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता असून, राज्याचे ग्रामीण राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
