पुणे : राज्यातील २९ महापालिकांसाठी गुरुवारी (ता. १५) मतदान पार पडल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मतदान संपताच समोर आलेल्या एक्झिट पोलने अनेकांचे गणित बिघडवले असून, सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे.
सत्ता महायुतीकडे जाण्याची शक्यता असली, तरी राजकीयदृष्ट्या सर्वात मोठा धक्का थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच बसल्याचे चित्र एक्झिट पोलमधून स्पष्ट होत आहे.

गेल्या तब्बल २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर ठाकरे कुटुंबियांचे वर्चस्व आहे. शिवसेनेतील ऐतिहासिक फूटीनंतर शिंदे गटाकडे अनेक नगरसेवक, नेते गेले, सत्ताही त्यांच्या हाती आली. मात्र तरीही मुंबईकरांनी आजही उद्धव ठाकरेंवर विश्वास टाकल्याचे संकेत एक्झिट पोल देत आहेत.
समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महायुती महापालिकेत सत्ता स्थापन करू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. या दोन्ही पक्षांना मिळून सुमारे १४० जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून ६२ ते ६५ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीला सुमारे २० जागा मिळू शकतात.

दरम्यान, JVC च्या एक्झिट पोलनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. भाजपला ९७ ते १०८ जागा, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ३२ ते ३८ जागा मिळू शकतात. याउलट, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ५२ ते ५९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. मनसेला २ ते ५, काँग्रेसला २१ ते २५, तर इतरांना ६ ते ९ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येथील सर्वात महत्त्वाचा आणि राजकीयदृष्ट्या स्फोटक मुद्दा म्हणजे
शिवसेना फुटल्यानंतरही उद्धव ठाकरे हे थेट एकनाथ शिंदेंपेक्षा अधिक जागा मिळवत असल्याचे चित्र आहे.
याचा अर्थ स्पष्ट आहे – सत्ता असली तरी जनाधार अजूनही ठाकरे यांच्याकडेच आहे.
जर हे अंदाज प्रत्यक्ष निकालात उतरले, तर सत्तेचा मुकुट शिंदे-भाजपच्या डोक्यावर असेल, पण नैतिक विजय मात्र उद्धव ठाकरेंचाच ठरेल. मुंबईकरांचे प्रेम आजही ठाकरे कुटुंबावर आहे, हेच या एक्झिट पोलमधून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
आता सर्वांच्या नजरा अंतिम निकालांकडे लागल्या आहेत.
सत्ता कुणाचीही असो, पण मुंबईने आज संदेश मात्र ठाकरेंच्या बाजूने दिला आहे – आणि हाच शिंदेंसाठी सर्वात मोठा धक्का आहे!