पुणे : जे.एस.पी.एम.एस. जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च, हडपसर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि दात्री संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रक्त कर्करोग जनजागृती अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
सकाळी १० वाजता झालेल्या उद्घाटन प्रसंगी दात्री संस्थेच्या वरिष्ठ समन्वयक सोनाली धस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत रक्त कर्करोगाविषयी मूलभूत माहिती दिली. तरुणांमध्ये या आजाराविषयी योग्य माहिती पोहोचणे अत्यावश्यक असून सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना तोंडातील लाळेचा सॅम्पल देऊन रक्त कर्करोगाच्या रुग्णांना मदत करण्याची सोपी व प्रभावी प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. बोन मॅरो डोनर म्हणून नोंदणी केल्यास एखाद्या रुग्णाचे प्राण वाचू शकतात, याची जाणीव करून देत धस यांनी विद्यार्थ्यांना या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत एकूण १३५ स्वयंसेवकांनी नोंदणी करून सॅम्पल दिले. पुढील काळातही या अभियानात सक्रिय योगदान देण्याची तयारी स्वयंसेवकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. नितीन बळीराम लोंढे यांनी भूषविले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पोतणीस, संकुल संचालक डॉ. वसंत बुगडे व डॉ. मारुती काळबांडे यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा उपक्रमांची गरज अधोरेखित करत विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला.
