पुणे: यशवंत सहकारी साखर कारखाना लि., चिंतामणीनगर (थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) यांच्या मालकीची जमीन विक्री करताना झालेल्या प्रक्रियात्मक त्रुटींवरून नव्याने वाद निर्माण झाला आहे. संबंधित त्रुटी दुरुस्त करण्याबाबतचे निवेदन महसूल विभागाकडून साखर आयुक्त व पणन संचालकांकडे पाठविण्यात आले आहे.
महसूल व वन विभागाच्या १२ डिसेंबर २०२५ रोजीच्या पत्रासह श्री. प्रशांत दत्तात्रय काळभोर यांनी दिलेले निवेदन पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागांना कळविण्यात आले आहे. शासनाच्या १६ सप्टेंबर २०२५ च्या निर्णयानुसार कारखान्याची ९९ एकर ९७ आर जमीन ही रु. २९९ कोटींना कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे यांना विक्रीस मंजूर करण्यात आली होती.
मात्र, या विक्रीसाठी आवश्यक असलेली महसूल विभागाची परवानगी न घेता व्यवहार मंजूर करण्यात आल्याबाबत श्री. प्रशांत काळभोर यांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यांच्या निवेदनावर मुख्यमंत्री महोदयांनी “अ.मु.स. (महसूल) तत्काळ तपासणी करावी व तोवर स्थगिती द्यावी” असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त कार्यालयाला संबंधित व्यवहाराबाबतचा सविस्तर अहवाल व स्वयंस्पष्ट अभिप्राय तातडीने शासनाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
सरकारच्या पातळीवर हा मुद्दा गंभीर मानला जात असून जमीन विक्री प्रक्रियेतील सर्व बाबींची तपासणी लवकरच वेगाने होण्याची शक्यता आहे.
