पुणे : पुणे येथे नवी दिल्लीमध्ये आयोजित एआय समिटदरम्यान शांततेत आंदोलन करणाऱ्या भारतीय युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह अध्यक्ष उदय भानू चिब यांना अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ पुणे जिल्हा शहर युवक काँग्रेसच्या वतीने गुडलक चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच भारतीय जनता पार्टी आणि पोलिस प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
आक्रमक झालेल्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनात प्रदेश प्रभारी शांभवी शुक्ल, प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, पुणे शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सौरभ अमराळे, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रथमेश आबनावे यांनी आरोप केला की, भाजपकडून लोकशाही दाबण्याचे काम सुरू असून पंतप्रधान मोदी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर मौन बाळगत आहेत. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे मौन गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.
उमेश पवार यांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई निषेधार्ह असल्याचे सांगितले. “आमचे नेते उदय भानू चिब यांना कार्यालयात जाऊन अटक करण्यात आली, ही घटना लोकशाहीला धरून नाही,” असे ते म्हणाले.
सौरभ अमराळे यांनीही पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत, न्यायासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. “युवक काँग्रेस अन्याय सहन करणार नाही. देशासाठी आणि न्यायासाठी आमचा लढा कायम सुरू राहील,” असा इशारा त्यांनी दिला.