पुणे : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन मास्टर (NiBM), पुणे येथील अ‍ॅडव्हान्स अ‍ॅबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्याने आपल्या विलक्षण बौद्धिक क्षमतेच्या जोरावर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मानाची नोंद करून संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित विशेष समारंभात केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहळ यांच्या हस्ते विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला.

पिंपरी सांडस (ता. हवेली) येथील रहिवासी अर्णव रमेश वायकर याने अवघ्या एका मिनिटात दोन अंकी × दोन अंकी असे तब्बल २२ गुणाकार अचूकपणे सोडवत हा विक्रम प्रस्थापित केला. अर्णव हा कोरेगाव मूळ येथे MSEB मध्ये सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या रमेश वायकर यांचा मुलगा आहे.

अर्णवने ही उल्लेखनीय कामगिरी NiBM चे संस्थापक व मुख्य संचालक नवनाथ हंबीर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली साध्य केली. या यशामागे वडील रमेश वायकर आणि आई सविता वायकर यांची खंबीर साथ, सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात आले.

सन्मान समारंभात बोलताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांनी अर्णवचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले,
“आजच्या स्पर्धात्मक युगात मेंदूचा विकास, गणितीय कौशल्ये आणि एकाग्रता वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. NiBM सारख्या संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे कार्य करत आहेत.”

NiBM, पुणे ही संस्था अ‍ॅडव्हान्स अ‍ॅबॅकस, ब्रेन डेव्हलपमेंट व बौद्धिक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत असून विद्यार्थ्यांमध्ये स्मरणशक्ती, एकाग्रता, आत्मविश्वास आणि तर्कशक्ती वाढविण्यावर विशेष भर दिला जातो. अर्णवच्या या यशाबद्दल पालक, शिक्षक आणि परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *