सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : हवेली तालुका पंचायत समितीची आगामी मासिक सभा ऐतिहासिक किल्ले सिंहगडावर आयोजित करण्यात येणार आहे. पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे आणि गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या नियमित कामकाजाला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभणार असून, तालुक्याच्या विकासप्रश्नांवर सिंहगडाच्या ऐतिहासिक भूमीवर विचारमंथन होणार आहे.

सामान्यतः पंचायत समितीच्या मासिक सभा मुख्यालयातील सभागृहात आयोजित केल्या जातात. या सभांमध्ये तालुक्यातील गावांच्या विकासकामांचा आढावा, शासकीय योजनांची अंमलबजावणी, स्थानिक प्रश्न, निधीचे नियोजन आणि विविध विकासकामांबाबत निर्णय घेतले जातात. मात्र, पंचायत समितीचे कामकाज केवळ मुख्यालयापुरते मर्यादित न राहता तालुक्यातील विविध भागांशी जोडले जावे, या उद्देशाने वर्षातील एखादी मासिक सभा वेगळ्या ठिकाणी घेण्याची संकल्पना सभापती युवराज काकडे यांनी मांडली.

या संकल्पनेला पंचायत समिती सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर हवेली तालुक्याचा ऐतिहासिक वारसा असलेल्या घेरा सिंहगड येथील किल्ले सिंहगडाची सभेसाठी निवड करण्यात आली. मुख्यालयाबाहेर सभा घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाची परवानगी आवश्यक असल्याने पंचायत समिती प्रशासनाने प्रस्ताव सादर केला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने सिंहगडावर सभा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सिंहगड हा हवेली तालुक्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक अस्मितेचा मानबिंदू आहे. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळी तालुक्याच्या विकासाचे प्रश्न मांडले जाणार असल्याने सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पश्चिम हवेलीतील गावांचे प्रश्न, किल्ले सिंहगड परिसरातील विकासकामे, पर्यटन सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि प्रलंबित कामांचा आढावा यावेळी घेतला जाण्याची अपेक्षा आहे.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील प्रश्नांना प्रत्यक्ष व्यासपीठ मिळण्याबरोबरच विकासकामांच्या नियोजनाला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. सिंहगडावरील या अभिनव सभेत कोणते निर्णय घेतले जातात आणि पश्चिम हवेलीच्या विकासासाठी कोणत्या उपाययोजना आखल्या जातात, याकडे संपूर्ण हवेली तालुक्याचे लक्ष लागले आहे.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *