पुणे : सोरतापवाडी गावाची पारंपरिक पिरसाहेब यात्रा दरवर्षी माघ सप्तमीला मोठ्या भक्तिभावात साजरी केली जाते. यंदा ही यात्रा रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ व सोमवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न होणार होती. मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करता यात्रेतील सर्व सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची आचारसंहिता सध्या लागू असल्याने तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पिरसाहेब यात्रा उत्सव कमिटी व समस्त ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे. सामाजिक जबाबदारीचे भान राखत आणि प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्याच्या भूमिकेतून हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.

यात्रेनिमित्त दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाचे उपक्रम व लोककलेचे आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षी हे सर्व कार्यक्रम पूर्णतः रद्द करण्यात आले असून, यात्रा अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात येणार आहे. फक्त धार्मिक विधी, पूजाअर्चा व नैवेद्य अर्पण करून परंपरेनुसार यात्रा पार पाडली जाणार आहे.

परंपरेप्रमाणे होणारा संदल कार्यक्रम शनिवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता संपन्न होणार आहे. या वेळी सर्व भाविकांनी शिस्त, शांतता व सौहार्द राखावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भात बोलताना पिरसाहेब यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष आप्पासाहेब चौधरी यांनी सांगितले की, सद्यस्थिती लक्षात घेता सर्वांच्या सहमतीने व सामाजिक जाणिवेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामस्थ व भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व नियमांचे पालन करावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *