पुणे : वनसगाव (ता. निफाड) येथील ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ विठ्ठलराव आवारे यांची राष्ट्रीय नोंदणीकृत माय माऊली शिवशक्ती फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

पत्रकारिता क्षेत्रात गेली तीन दशके कार्यरत असलेले रामभाऊ आवारे हे द युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, वारकरी मंच स्टार प्रचारक व प्रदेश प्रसिद्धी प्रमुख, लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, तसेच विविध वृत्तपत्रांचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय विठ्ठल-रखुमाई अध्यात्मिक विचार मंचचे महाराष्ट्र राज्य मुख्य संचालक म्हणूनही ते कार्य पाहत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक, कायदेशीर, वैद्यकीय, अध्यात्मिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा, कृषी व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आल्याचे निवडपत्रात नमूद करण्यात आले आहे. संस्थेच्या ध्येय-धोरणांनुसार कार्य करून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या निवडीची माहिती माय माऊली शिवशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व सचिव डॉ. संदीप काकड, राष्ट्रीय महिला अध्यक्ष सौ. रेखा संदीप काकड आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष इंजिनिअर साहिल काकड यांनी दिली. रामभाऊ आवारे यांच्या निवडीबद्दल फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.