पुणे : स्वच्छ, चारित्र्यवान, प्रामाणिक आणि कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी ही देशाची खरी संपत्ती आहे. आपले काम प्रामाणिकपणे करणारा प्रत्येक व्यक्ती हा देशभक्तच आहे. देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होत असताना २०४७ मध्ये भारत एक विकसित राष्ट्र व्हावा, हे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असले पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने आपल्या-आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन निवृत्त प्रशासकीय अधिकारी व चाणक्य मंडल संस्थेचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी केले.

नागरिक सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित ‘भारत २०४७ आणि मी’ या विषयावरील व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे वक्ता विभागप्रमुख दीपक मेहेंदळे, विश्वस्त अमेय सप्रे, प्रीतम थोरवे आदी उपस्थित होते.
धर्माधिकारी म्हणाले, आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलो तरी काम करताना आपल्या मनातील भारत मातेचा कार्यकर्ता सदैव जागा राहिला पाहिजे. भारत विकसित राष्ट्र व्हावे, हे स्वप्न केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नसून प्रत्येक भारतीयाचे असले पाहिजे. “माझा भारत विकसित झाला पाहिजे आणि त्यासाठी मी प्रामाणिकपणे योगदान देईन,” ही भावना प्रत्येक नागरिकात निर्माण होणे गरजेचे आहे.

प्रशासन हे देशसेवेचे प्रभावी माध्यम असून त्यातून राष्ट्रसेवा व विकासाला गती दिली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. अमेरिका हे राष्ट्र केवळ अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयांमुळे महासत्ता झाले नाही, तर तेथील प्रत्येक नागरिकाच्या प्रयत्नातून ते विकसित झाले आहे. त्याच धर्तीवर भारत विकसित राष्ट्र होण्यासाठी प्रत्येक भारतीयाने प्रामाणिकपणे हातभार लावला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
भविष्यात भारताला हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर या दोन्ही क्षेत्रांत आघाडीवर राहायचे असेल, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेमीकंडक्टरसारख्या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये देशाने अग्रस्थानी राहणे आवश्यक असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रस्ताविक भाषणात अमेय सप्रे म्हणाले, ‘देश प्रथम’ हेच संस्थेचे ध्येय असून त्यानुसारच संस्थेचे कार्य सुरू आहे. धोरणात्मक सुधारणांवर भर देत वक्फ बोर्डासंदर्भात केंद्र सरकारने स्थापन केलेल्या संयुक्त समितीसमोर संस्थेने सादरीकरण केले असून त्यातील काही मुद्द्यांचा विचार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली गोडबोले-जोशी यांनी केले, तर पुष्कराज सप्रे यांनी आभार मानले.