संभाजी पुरीगोसावी, प्रतिनिधी
नशिराबाद : जळगाव जिल्हा पोलिस दलातील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी नशिराबाद पोलिस ठाण्याचा प्रभारी पदभार स्वीकारताच गुन्हेगारीविरोधात ठोस आणि आक्रमक पावले उचलली आहेत.

२७ डिसेंबर २०२५ रोजी पदभार स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच त्यांच्या नेतृत्वाखाली नशिराबाद पोलिसांनी अवैध धंदे आणि गुन्हेगारांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
जिल्ह्याचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. या मोहिमांमध्ये एका सराईत गुन्हेगार टोळीला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असून, खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.

याशिवाय वाळूमाफिया, गोमांस तस्करी, अवैध दारू विक्री, जुगार आदी बेकायदेशीर धंद्यांवर कडक कारवाई केल्याने परिसरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. सातत्यपूर्ण कारवाईमुळे नशिराबाद परिसरात कायद्याचा प्रभाव वाढला असून गुन्हेगारी घटनांमध्ये घट होत असल्याचे चित्र आहे.
ही संपूर्ण कामगिरी सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे व त्यांच्या पथकाने अत्यंत प्रभावीपणे पार पाडली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे नशिराबाद पोलिसांविषयी नागरिकांमध्ये विश्वास वाढला असून, परिसरातून पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.