प्रतिनिधी, शुभांगी सरोदे-पुरीगोसावी

पुणे : भुईंज (ता. वाई) पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेल्या तब्बल ६ लाख ७० हजार रुपये किमतीच्या ३० मोबाईल फोनचा शोध घेण्यात भुईंज पोलिसांना यश आले आहे. हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये आयफोन १४ प्रो मॅक्स या महागड्या मोबाईलचाही समावेश आहे. भुईंज व पाचवड ही मुख्य बाजारपेठ असल्याने परिसरातील गावांमधून हजारो नागरिक खरेदी-विक्रीसाठी ये-जा करीत असतात.

प्रवासादरम्यान तसेच गर्दीच्या ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याच्या घटनांत वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पृथ्वीराज ताटे यांनी गहाळ मोबाईल शोध मोहीम हाती घेतली.

पोलीस ठाण्यातील डी.बी. पथकास विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल आकाश कुंभार व सागर मोहिते यांनी सीईआयआर (CEIR) पोर्टल तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे महाराष्ट्रासह इतर राज्यांत वापरात असलेल्या मोबाईल धारकांशी सातत्याने संपर्क साधला. शिताफीने राबविलेल्या मोहिमेत ३० स्मार्टफोन हस्तगत करण्यात यश आले.

यापुढेही गहाळ मोबाईल शोधण्याची मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रभारी अधिकारी पृथ्वीराज ताटे यांनी सांगितले.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सुरेश शिंदे, स.पो.फौ. टकले, पोलीस हवालदार नितीन जाधव, कोलवडकर, पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे, रमेश बरके, बल्लाळ, निंबाळकर आदींच्या सहभागाने पार पडली. भुईंज पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांतून विशेष कौतुक व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *