पुणे : उरुळी कांचन येथील महत्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय येथे वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘प्राप्तिकर आणि वस्तू व सेवा कर’ या मूलभूत प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात झाले.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सनदी लेखापाल तन्मय जवळकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना प्राप्तिकर आणि जीएसटी संदर्भातील सविस्तर मार्गदर्शन केले. जीएसटी नोंदणी प्रक्रिया, इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची पद्धत तसेच करप्रणालीतील अलीकडील बदल यांची माहिती प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे देत विषय अधिक सोपा व समजण्यास सुलभ करून सांगितला. विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधानही त्यांनी केले.

सनदी लेखापाल ऐश्वर्या गुंदेचा यांनी अभ्यासक्रमाचे व्यावसायिक व सामाजिक महत्त्व विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. करसाक्षरतेचे महत्त्व, वैयक्तिक प्रगतीच्या संधी तसेच करसल्लागार, अकाउंटंट व स्वतंत्र व्यवसायाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या रोजगारसंधींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांनी विद्यार्थ्यांनी केवळ पदवी शिक्षणावर समाधान न मानता व्यावहारिक व कौशल्याधारित ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर संकल्पना स्पष्ट करत आजच्या स्पर्धात्मक युगात करप्रणालीचे ज्ञान अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सर्व विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविकात वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. सुजाता गायकवाड यांनी अभ्यासक्रमाचे स्वरूप, उद्दिष्टे व भविष्यातील व्यावसायिक संधी यांची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. ज्ञानदेव पिंजारी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. कमरुनिसा शेख यांनी मानले.
या कार्यक्रमास सनदी लेखापाल कार्यालयातील कोमल पवार, अंबिका तांबे तसेच वाणिज्य विभागातील प्रा. अनुप्रिता भोर, प्रा. रविंद्र मुंढे, प्रा. रोहित बारवकर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.