पुणे : सरदवाडी (ता. शिरूर) हद्दीत बुधवारी (ता. ११) रात्री घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा शिरूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली. संतोष बाळासो पवार (वय २४, रा. कडधे, ता. शिरूर) यांचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११.२५ वाजण्याच्या सुमारास आय.एफ.सी. कंपनीजवळ ही घटना घडली. अज्ञात कारणावरून नितीन उर्फ देवा उर्फ प्रविण सुरेश उर्फ सुरज चव्हाण (वय २५, रा. पिंपळगाव, ता. आंबेगाव) आणि गणेश तानाजी साळुंखे (वय १९, रा. निर्गुडसर, ता. आंबेगाव) यांनी संतोष पवार यांच्यावर छाती, हात व पाठीवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात संतोष गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

या घटनेप्रकरणी मृताच्या पत्नीने शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यानुसार खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी स्थानिक नागरिकांकडून माहिती संकलित केली.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ हालचाल करून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले व अटक केली. सध्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले धारदार शस्त्र जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोविंद खटींग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिस ठाण्याच्या पथकाने केली असून परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.