पुणे : रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने कंपनीतील केबल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे १८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री रांजणगाव, खंडाळे माथा (ता. शिरूर, जि. पुणे) येथील ‘स्पर्श इलेक्ट्रॉनिक’ कंपनीतून केबल वायरचे बंडल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याप्रकरणी शिक्रापूर येथील अर्केज रामराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने रांजणगाव, शिक्रापूर व परिसरातील ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला.
दरम्यान, मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तळेगाव ढमढेरे परिसरातील तिघांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर विकास संतोष पवार (२७), रोहित गणेश शिंदे (२०) व ओमकार फकिरा काळे (२०) यांना अटक करण्यात आली.

तपासादरम्यान चोरीचा माल फैजान इमरान खान (२३, कोंढवा खुर्द, पुणे) याला विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीचा माल, गुन्ह्यासाठी वापरलेली मालवाहू कॅरी व दोन मोटारसायकली असा एकूण १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींनी ऑगस्ट २०२५ मध्येही अशाच प्रकारे केबल चोरी केल्याचे तपासात उघड झाले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह मिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर तसेच होमगार्ड सहुल इचके, शैलेश जगताप, बारकू गोडसे व रामदास शिंदे यांनी ही कारवाई पार पाडली. पुढील तपास दत्तात्रय शिंदे करीत आहेत.