पुणे : बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुरुवारी दुपारी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका युवकास अटक करून त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले.

पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास राणी लक्ष्मीबाई उद्यान परिसरात संशयित रोहित संतोष मारकड (वय २१, रा. उपळाई (रमाळा), ता. कळंब, जि. धाराशिव; सध्या रा. चोरमोले प्लॉट, बार्शी) यास ताब्यात घेण्यात आले.

पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे मॅगझीनसह गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस विनापरवाना आढळून आले.
या प्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ६८/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर करीत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर व उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही कामगिरी बजावली.

अवैध शस्त्रे अथवा संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

शहराच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *