पुणे : शहरातील घनकचरा व्यवस्थापन विभागाचा आंधळा कारभार उघडकीस आला असून स्वच्छतागृहे आणि कचऱ्याची नियमित स्वच्छता न झाल्यास आपण स्वतः झाडू हाती घेऊ, असा इशारा उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी दिला. घनकचरा विभागाचे प्रमुख अविनाश सपकाळ यांच्यासमोरच त्यांनी ही तंबी दिली.

कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या चौथ्याच दिवशी वाडेकर यांनी सकाळी सहा वाजता अचानक पाहणी केली. यावेळी सपकाळ, क्षेत्रीय आयुक्त नायकर, मुख्य आरोग्य निरीक्षक इनामदार, आरोग्य निरीक्षक विनायक चोपडे, प्रवीण दरेकर, मुकादम संतोष शेलार, सिद्धार्थ बागुल आदी अधिकारी उपस्थित होते. दोन-तीन आरोग्य कोठ्यांना भेट देत त्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची तपासणी केली.

पाहणीदरम्यान कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली असता खुद्द आरोग्य निरीक्षक अनुपस्थित असल्याचे आढळले. ५४ सफाई कर्मचाऱ्यांपैकी केवळ २३ कर्मचारी हजर होते. मात्र, मागील हजेरी पत्रकावर १०० टक्के उपस्थिती दाखवण्यात आल्याचे निदर्शनास आले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून एकमेकांच्या चुकांवर पांघरूण घालण्याचे प्रकार सुरू असल्याचे दिसून आले.

उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली असून अनुपस्थितांवरही कारवाई होणार असल्याचे वाडेकर यांनी स्पष्ट केले. “आरोग्य हा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. विशेषतः झोपडपट्ट्यांतील नागरिकांना अस्वच्छतेमुळे नरकसदृश परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था बिकट असून कचरा वेळेवर उचलला जात नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,” असे त्यांनी सांगितले.

घनकचरा विभागाचे प्रमुख सपकाळ यांच्यासमोरच वस्तुस्थिती स्पष्ट झाली असून कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. विभागाच्या कारभारात तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही वाडेकर यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *