पुणे : छत्रपती शिवरायांनी दाखविलेला मार्ग हा सर्वांगीण विकासाचा मार्ग असून त्यांच्या कार्याचा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

किल्ले शिवनेरी येथे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास आणि भूगोल वेगळा असता, असे नमूद करत मुख्यमंत्री म्हणाले की, आई जिजाऊंच्या संस्कारांतून घडलेल्या शिवरायांनी रयतेचे स्वराज्य स्थापन करून हिंदुस्थानाला नवी दिशा दिली. अठरा पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून त्यांनी समता, न्याय आणि स्त्रीसुरक्षा यांवर आधारलेली राज्यव्यवस्था उभी केली. सुमारे ५० प्रकारचे कर रद्द करून सुटसुटीत करप्रणाली निर्माण केली तसेच जलदुर्ग उभारून समुद्रमार्गे होणाऱ्या आक्रमणांना आळा घातला.

राज्यातील गड-किल्ले शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देत असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले की, पंतप्रधानांच्या पुढाकाराने शिवनेरीसह १२ किल्ल्यांना UNESCO जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. २७ देशांनी यास एकमताने मान्यता दिली. राज्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिवरायांच्या विचारांवर चालणारा बलशाली आणि स्वाभिमानी महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार सरकारने केला आहे. ‘शिवराई’ चलन व्यवस्था, जलव्यवस्था आणि पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पना त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहेत.

गड-किल्ल्यांचे जतन आणि स्वच्छता मोहीम अधिक वेगाने राबविली जाईल. उपमुख्यमंत्री पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या शिवनेरी विकासावरील दृष्टिकोनाचा उल्लेख केला. ‘किल्ले शिवनेरी विकास आराखडा’ साकारत या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. जुन्नर तालुक्याला पर्यटन तालुका म्हणून विकसित करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. पोलिसांनी मानवंदना दिली, तर विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित सादरीकरण केले. मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना ‘शिवनेर भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुख्यमंत्री यांनी राज्यातील आणि जगभरातील शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *