पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून अल्पावधीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ८९ गुंतवणूकदारांची ३ कोटी ३९ लाख १२ हजार ६३७ रुपयांची फसवणूक करणाऱ्या आणि मागील तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पुणे शहर पोलिसांनी नाशिक येथून अटक केली आहे.

भारत सोपान पठारे (वय ३०, रा. नाऊरगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी चंदन नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून आरोपी मागील तीन वर्षांपासून पोलिसांच्या शोधात होता.

सप्टेंबर २०२१ ते दि. ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत आरोपी भारत पठारे व त्याच्या सहकाऱ्यांनी ‘एफ. ट्रेड सेल्स एजन्सी प्रा. लि.’ या कंपनीच्या नावाखाली मुंबईतील बोरीवली आणि पुण्यातील खराडी येथे कार्यालये सुरू केली होती. तेथे येणाऱ्या नागरिकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत अधिक परतावा मिळवून देण्याचे आश्वासन दिले जात होते.

प्रारंभी काही गुंतवणूकदारांना अल्प प्रमाणात परतावा देऊन विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर मोठ्या रकमा गुंतवणुकीच्या स्वरूपात स्वीकारून पैशांचा अपहार करण्यात आला. या प्रकरणी गु.र. नं. ५१४/२०२३ अन्वये भा.दं.वि. कलम १२० (ब), ४०६, ४१९, ४२०, ४०९ तसेच १९९९ च्या कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

आरोपी नाशिक परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाथर्डी फाटा, नाशिक येथून त्याला ताब्यात घेतले. दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याला अधिकृत अटक करण्यात आली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ७ सोमय मुंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश बडाख, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळवे तसेच पोलिस कर्मचारी गुरव, घावटे, घाडगे आणि पोलिस अंमलदार बेंद्रे यांनी ही कारवाई केली.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, अन्य सहआरोपींचा शोध घेतला जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *