पुणे : अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या गंधर्व संगीत परीक्षेत उरुळी कांचन येथील साने संगीत क्लासेसने तब्बल ९८ टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करत क्लासेसचा लौकिक अधिक वृद्धिंगत केला.

या यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ काल दुपारी उरुळी कांचन येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार श्री सहदेव खंडागळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. डॉ. श्री रविंद्र भोळे, कवी व इतिहास संशोधक श्री खलील शेख, पत्रकार सौ. सुवर्णाताई कांचन, सोरतापवाडी गावाचे उद्योजक व पत्रकार श्री बापूसाहेब चौधरी, श्री अमोल भोसले तसेच श्री. सुनील तुपे उपस्थित होते.

साने संगीत क्लासेसचे प्रमुख व सर्व वाद्यांमध्ये पारंगत असलेले श्री शिवराज साने सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले. त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांचा या यशात मोठा वाटा असल्याचे मान्यवरांनी गौरवोद्गार काढताना सांगितले. क्लासेसमध्ये वार्षिक सहल, स्नेहसंमेलन, आकाशवाणी व दूरदर्शनवरील विद्यार्थी सहभाग, समाजप्रबोधन व जनजागृती पथनाट्ये अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

यावेळी संस्कृती अंधारे, वैष्णवी साळुंखे, रणक खरात, वेदांत गायकवाड, संकेत खंडागळे, श्रेयस गायकवाड, रुद्र जाधव, आरोही साळुंखे, यशराज साळुंखे, ऋतुजा आवळे, रियान गाडीलकर, सुयश घनवट, ओमकार कुंजीर, श्रेयस माने, समर्थ मुंडे आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवराज साने यांनी केले. सूत्रसंचालन श्री रोहिदास बिचकुले यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार श्री अमोल भोसले यांनी केले. या यशाबद्दल सर्व स्तरांतून साने संगीत क्लासेसचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *