रामभाऊ आवारे, प्रतिनिधी
निफाड : देवगाव फाटा रस्त्यालगत शेतात नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला असून त्याचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉ.अमोल दराडे यांनी व्यक्त केला आहे. मात्र या घटनेने देवगावसह परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरातील दत्तू कोंडाजी बोचरे यांच्या मालकीच्या गट क्रमांक ९६/२ मधील शेतात आज मंगळवार, दि.२४ दुपारी सुमारे दुपारी १ वाजण्याच्या सुमारास चिक्कू फळबाग परिसरात काम करणाऱ्या

मजुरांना बिबट्या पडलेल्या अवस्थेत दिसून आला. सुरुवातीला बिबट्याची हालचाल असल्याची शंका व्यक्त करण्यात आली; मात्र जवळ जाऊन पाहणी केल्यानंतर तो मृत असल्याचे स्पष्ट झाले. तात्काळ याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे, वनपरिमंडळ अधिकारी जयप्रकाश शिरसाठ, वनरक्षक विजय दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड बचाव पथकातील ज्ञानेश्वर पवार, सादिक शेख, वैभव दौंड, विजय माळी, काशिनाथ माळी, शरद चांदोरे, सागर दुसिंग, भारत माळी आदी अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी परिसराची पाहणी करून आवश्यक ती खबरदारी घेत पंचनामा केला. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय वाहनाद्वारे पशुवैद्यकीय अधिकारी, श्रेणी–१, डॉ. अमोल दराडे यांच्याकडे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
याप्रसंगी उपसरपंच लहानु मेमाने, पोलीस पाटील सुनील बोचरे, ग्रामपंचायत सदस्य किशोर बोचरे, अण्णासाहेब बोचरे, चांगदेव बोचरे, रामु बोचरे आदी उपस्थित होते.
मृत बिबट्या अंदाजे ५ ते ६ वर्षांचा नर आहे. सदर बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले असून प्राथमिक निष्कर्षानुसार त्याचा मृत्यू उपासमारीमुळे झाल्याचे दिसून येते.
डॉ.अमोल दराडे,
पशुवैद्यकीय अधिकारी
अलीकडील काळात परिसरात बिबट्यांच्या हालचाली वाढल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सायंकाळनंतर व रात्रीच्या वेळी शेतात किंवा मोकळ्या जागी एकटे जाणे टाळावे. तसेच वन्यप्राण्यांची हालचाल आढळल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा.
विजय दोंदे, वनरक्षक, विंचूर