पुणे, ता. २५ : जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त अमृतानुभव फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘विश्व मराठी भाषा कर्तृत्व संमेलन २०२६’ अंतर्गत श्री गोपीनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वरवंड येथील वरिष्ठ लिपिक मा. श्री. रामचंद्र मकाजी टेंगले यांची ‘महाराष्ट्र उत्कृष्ट कार्यालयीन व्यवस्थापन पुरस्कार’ासाठी एकमताने निवड करण्यात आली आहे.

मराठी भाषा, संस्कृती, समाज व राष्ट्रासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय, प्रेरणादायी आणि आदर्श कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. शालेय प्रशासनातील शिस्तबद्धता, कार्यतत्परता आणि परिणामकारक कार्यालयीन व्यवस्थापन यामुळे टेंगले यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीत लक्षणीय सुधारणा घडवून आणली आहे. त्याचबरोबर मराठी भाषेच्या संवर्धन, प्रचार व प्रसारासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेत विविध उपक्रम राबविले आहेत.

मराठी भाषेच्या जतनाबरोबरच समाजघडणीच्या दृष्टीने त्यांनी केलेले योगदान भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार सुप्रसिद्ध पार्श्वगायक ज्ञानेश्वरजी मेश्राम (सारेगमप फेम) यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. सन्मान सोहळा शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यिक, कलाकार व समाजसेवक उपस्थित राहणार असून, मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेच्या गौरवाचा संदेश देण्यात येणार आहे. मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात येणार आहे.