पुणे : “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” या उक्तीप्रमाणे मराठी भाषेचा गौरव साजरा करत विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुर येथे विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन तसेच विविध साहित्यिकांच्या पुस्तक पूजनाने सर्व शिक्षक-शिक्षिकांच्या हस्ते करण्यात आली. मुख्याध्यापक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, भाषण, रांगोळी, निबंध, वेशभूषा, गीतगायन तसेच समूह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सहशिक्षिका सविता शितोळे, सुशीला सातपुते, सुषमा दरेकर, कल्पना तांबे, छाया कांबळे, दीपिका गायकवाड, तेजस्विनी कोतवाल आणि प्रियांका कोतवाल यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.

चित्रकला स्पर्धा
लहान गट (इ. ५ वी ते ७ वी) व मोठा गट (इ. ८ वी व ९ वी) अशा विभागांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. विविध वर्गांतील विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत आपली कलात्मकता सिद्ध केली.

वेशभूषा स्पर्धा
आर्या मगर, ऐश्वर्या गुंडे, श्रेया कोतवाल, ज्ञानेश्वरी भगत, आदिती सोनवणे, मानसी उकरंडे व तेजस साळवे यांनी आकर्षक सादरीकरण केले.

रांगोळी स्पर्धा
श्रावणी शितोळे, तेजस साळवे व छाया आगलावे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळवले.

वक्तृत्व स्पर्धा
लहान व मोठा गट अशा दोन विभागांत स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी ‘मायबोली मराठी भाषा’ व ‘मराठी भाषेचे महत्त्व’ या विषयांवर प्रभावी मते मांडली.

निबंध स्पर्धा
पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी लहान व मोठा गटात निबंध स्पर्धा घेण्यात आली. मराठी भाषेच्या जतन व संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या लेखणीतून दिला.
स्पर्धांचे परीक्षण अनिल कुंजीर, हरिचंद्र खेडेकर, अमर वारे, सुशीला सातपुते, कल्पना तांबे, छाया कांबळे, दीपिका गायकवाड, सविता शितोळे, प्रियांका कोतवाल, राजेश्वरी कोतवाल व सुषमा दरेकर यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा दरेकर यांनी तर आभार प्रदर्शन सविता शितोळे यांनी केले. मराठी भाषेचा गौरव आणि साहित्यिक वारसा जपण्याचा संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *