पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात रसायनशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने, तसेच बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन यांच्या सहकार्याने माती परीक्षण व विश्लेषण आणि पाणी परीक्षण व विश्लेषण या दोन स्वतंत्र प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा शुभारंभ उत्साहात झाला.

हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयचे प्रा. डॉ. किसन गाडवे यांच्या हस्ते पद्मश्री मणिभाई देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभ्यासक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे होते. व्यासपीठावर रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. नंदिनी सोनवणे, अभ्यासक्रम समन्वयक प्रा. दिपाली चौधरी व प्रा. प्रणिता फडके उपस्थित होते.

उद्घाटनपर भाषणात प्रा. गाडवे यांनी माती व पाणी परीक्षणासाठी गावोगावी प्रयोगशाळा स्थापन करण्याची गरज अधोरेखित केली. विद्यार्थ्यांनी भविष्यात रोजगारनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, तसेच चाचणी व प्रमाणीकरण प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन मान्यता मंडळाचे अधिकृत प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्राचार्य डॉ. बोऱ्हाडे यांनी पारंपरिक शेतीविषयक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालण्यासाठी असे अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाबरोबरच समाज सक्षम करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयाने हा उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी नमूद केले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना माती व पाणी परीक्षणासंदर्भात सल्लासेवा देण्याच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. प्रणिता फडके यांनी केले. आभार प्रदर्शन कु. हर्षदा थोरात यांनी केले. या अभ्यासक्रमांसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून परिसरात उपक्रमाबद्दल उत्सुकता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *