पुणे : विश्व आयुर्वेद परिषद राजस्थान चिकित्सक प्रकोष्ठ, जोधपूर प्रांताच्या वतीने एक दिवसीय विद्धकर्म कार्यशाळा उत्साहात आणि यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली. प्रांत प्रभारी डॉ. पवन सिंह शेखावत यांनी ही माहिती दिली.
कार्यशाळेत पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथून आलेले विद्धकर्म विशेषज्ञ प्रा. डॉ. अमोल उत्तम बनसोडे यांनी सहभागी चिकित्सकांना सैद्धांतिक तसेच प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण सत्र अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक ठरले. यामध्ये विद्धकर्माची तंत्रे, रोगानुसार योग्य निवड आणि सुरक्षित पद्धतीने उपचार कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

जोधपूर, अजमेर, सीकर, नागौर आदी जिल्ह्यांतील शेकडो आयुर्वेद तज्ज्ञांनी कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमादरम्यान काही रुग्णांवर विद्धकर्म पद्धतीने यशस्वी उपचार करण्यात आले. त्यामुळे उपस्थितांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राजस्थान आयुर्वेद विद्यापीठचे कुलगुरू प्रा. वैद्य गोविंद सहाय शुक्ल, प्रदेशाध्यक्ष डॉ. राकेश कुमार शर्मा तसेच प्रदेश कोषाध्यक्ष डॉ. राजाराम अग्रवाल उपस्थित होते.

प्रा. वैद्य गोविंद सहाय शुक्ल यांनी विद्धकर्म ही तात्कालिक शूलप्रशमनासाठी प्रभावी आयुर्वेद चिकित्सा पद्धती असल्याचे सांगितले. भविष्यातही अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, जेणेकरून अधिकाधिक चिकित्सक या विद्येत पारंगत होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रदेशाध्यक्ष डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी जोधपूरप्रमाणेच जिल्हास्तरावर आयुर्वेद कार्यशाळा सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. डॉ. अमोल बनसोडे यांनी सद्यःशूलप्रशमनासह २०० हून अधिक जटिल आजारांवर विद्धकर्म उपयुक्त ठरत असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा संयोजक डॉ. अभिषेक दाधीच, डॉ. अशोक कुमार मित्तल, डॉ. नवनीत दाधीच, डॉ. रामस्वरूप विश्नोई, डॉ. घमेंद्र पारीक, डॉ. प्रेमसुख, डॉ. कृष्ण गोपाल शर्मा, डॉ. खुशाल सिंह सांखला आदींनी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *