पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महत्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांची सुला वाईनयार्ड, नाशिक येथे औद्योगिक शैक्षणिक भेट उत्साहात पार पडली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या भेटीत विभागप्रमुख प्रा. अनुजा झाटे, प्रा. स्वाती मासळकर, प्रयोगशाळा सहायक सीमा विसनगरकर व विशाल महाडिक यांच्यासह एकूण ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. औद्योगिक भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना वाइन निर्मिती प्रक्रियेमधील सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रत्यक्ष औद्योगिक अनुप्रयोग समजावून देणे हा होता.

विद्यार्थ्यांना वाइन निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष दाखविण्यात आली. द्राक्ष क्रशिंग, फर्मेंटेशन प्रक्रिया, यीस्टची भूमिका, तापमान नियंत्रण, परिपक्वता प्रक्रिया तसेच गुणवत्ता तपासणी याबाबत सविस्तर वैज्ञानिक माहिती देण्यात आली. याशिवाय वाइन टेस्टिंगची पद्धत, सुगंध व चव ओळखण्याचे तंत्र, उत्पादनाचे पॅकेजिंग, ब्रँडिंग व वितरण प्रणाली याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी उत्पादन युनिट, किण्वन टाक्या, साठवण व्यवस्था आणि पॅकेजिंग विभागाची पाहणी करून औद्योगिक कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना अन्न व पेय उद्योगामध्ये सूक्ष्मजीवशास्त्राचा उपयोग प्रत्यक्ष पाहण्याची मौल्यवान संधी मिळाली.
यावेळी विद्यार्थ्यांनी जवळच असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर या तीर्थक्षेत्रालाही भेट दिली.

सूक्ष्मजीवशास्त्र विभागामार्फत
आयोजित करण्यात आलेली ही औद्योगिक भेट शैक्षणिक व आध्यात्मिक अनुभवांनी समृद्ध ठरली असून विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानात भर घालणारी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *