पुणे : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट यांच्या वतीने रावेत येथील अचीवर्स क्रिकेट मैदानावर आयोजित ‘पीसीइटी प्रीमिअर लीग २०२६’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, युवा उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांसह विविध शाखांचे प्राचार्य, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

संस्थेच्या विविध शाखांतील १५ पुरुष व १० महिला संघांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रत्येकी सहा षटकांच्या सामन्यांमुळे स्पर्धेला वेगळी रंगत आली. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात पीसीसीओइ वॉरियर्स संघाने एसबीपीपीएस स्पार्टन्सवर ३९ धावांनी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना वॉरियर्सने सहा षटकांत १०६ धावांचा डोंगर उभा केला. मॅन ऑफ द मॅच प्रशांत गराडे यांनी अवघ्या १३ चेंडूत ४८ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

प्रत्युत्तरात स्पार्टन्स संघाला ६७ धावांपर्यंतच मजल मारता आली.
महिला गटाच्या अंतिम सामन्यात एसबीपीपीएस क्वीन्स संघाने पीसीसीओइआर वॉरियर्सवर ७ विकेट्स राखून विजय मिळविला. वॉरियर्सने ३६ धावांचे आव्हान दिले होते. हे लक्ष्य क्वीन्सने ४.३ षटकांत पूर्ण केले. माहेश्वरी पाटील यांना ‘वूमन ऑफ द मॅच’ घोषित करण्यात आले.

उत्कृष्ट फलंदाज (ऑरेंज कॅप) अंकित तांबे व प्रिया डोंगरे, उत्कृष्ट गोलंदाज (पर्पल कॅप) अंकित तांबे व शीतल मोरे, तर अष्टपैलू खेळाडू म्हणून अंकित तांबे व ज्ञानेश्वरी भेगडे यांचा कॅप, चषक व डिजिटल घड्याळ देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेचे यशस्वी आयोजन संतोष पाचारणे व सहकाऱ्यांनी विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *