पुणे : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनी फिडेल सॉफ्टटेक लि. ने जपानस्थित आयएम कॉर्पोरेशन या तंत्रज्ञान सल्लागार व सॉफ्टवेअर सेवा देणाऱ्या कंपनीतील ८३ टक्के हिस्सा संपादित केला आहे. या व्यवहारामुळे ‘फिडेल’च्या सेवा व वितरण क्षमतेत लक्षणीय वाढ होणार असून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपाययोजनांच्या विस्तारासाठी मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कुलकर्णी म्हणाले, जपान आणि भारत यांदरम्यान उच्च दर्जाचे तंत्रज्ञान, द्विभाषिक सल्ला सेवा व भाषा अभियांत्रिकी क्षेत्रात ‘फिडेल’ गेली २५ वर्षे कार्यरत आहे. आयएमच्या भागीदारीमुळे जपानी उद्योगांच्या गरजांनुसार कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सेवा, उद्योग उपाययोजना अंमलबजावणी, व्यवस्थापित सेवा आणि भाषा स्थानिकीकरण या क्षेत्रांमध्ये कंपनीची ताकद वाढेल. स्थानिक प्रकल्प व्यवस्थापन कौशल्य आणि जागतिक तंत्रज्ञान क्षमतेच्या साहाय्याने नावीन्यपूर्ण परिणाम देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

आयएम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी रेन्या किकुची यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांत कंपनीने ‘न्युरल नॉलेज फ्रेमवर्क’च्या माध्यमातून डिलिव्हरी उत्पादकता आणि ज्ञान पुनर्वापर सुधारला आहे. १५० हून अधिक तज्ज्ञांच्या टीमसह उच्च गुणवत्ता सेवा देण्यासाठी दोन्ही कंपन्या सज्ज आहेत.
डॉ. गिरीश देसाई यांनी ही भागीदारी भारतीय उद्योजकांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. अनिल पटवर्धन यांनी जून २०२२ पासून कंपनीने सातत्याने महसूल वाढ नोंदवल्याचे नमूद केले. डॉ. दीपक शिकारपूर व सुनील देशमुख यांनीही या व्यवहारामुळे भागधारकांना दीर्घकालीन मूल्यनिर्मितीची संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.