पुणे : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे शंतनू धुमाळ सोशल फाउंडेशन यांच्या वतीने मोफत आयुष्यमान कार्ड, अभा कार्ड नोंदणी, नवीन मतदान नोंदणी तसेच विविध शासकीय कार्डांचे मोफत वाटप असा सर्वसमावेशक उपक्रम उत्साहात पार पडला.

या शिबिराला जेष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे ८७१ हून अधिक नागरिकांनी उपस्थिती दर्शवली.

सदर उपक्रमाचे उद्घाटन कुंजीरवाडी येथील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष शंतनू धुमाळ, नवनाथ आबा काकडे, सचिन तात्या तुपे, युवराज काकडे, सुनीता धुमाळ, स्वप्नील कुंजीर पाटील, नयन तुपे, निखिल काळभोर, प्रकाश धुमाळ तसेच दत्तात्रय धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर लगेचच नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. जेष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य सुरक्षा, अभा कार्डद्वारे डिजिटल आरोग्य ओळख तसेच मतदान नोंदणीसाठी मार्गदर्शन यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत आभार व्यक्त केले. ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेकांना प्रत्यक्ष मदत झाली.
सामाजिक बांधिलकी जपत अशा प्रकारचे उपक्रम पुढेही राबविण्याचा मानस फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.