पुणे : एंजल हायस्कूलमध्ये दिनांक २८ फेब्रुवारी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्ताने शाळेत भव्य विज्ञान प्रदर्शनी भरविण्यात आली.

प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेली विविध विज्ञानाधारित मॉडेल्स, प्रात्यक्षिके आणि प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र तसेच पर्यावरण विषयांवरील संकल्पना विद्यार्थ्यांनी सोप्या आणि आकर्षक पद्धतीने मांडल्या. काही विद्यार्थ्यांनी सौरऊर्जा, पाणी शुद्धीकरण प्रक्रिया, प्रदूषण नियंत्रण यांसारख्या विषयांवर कार्यरत मॉडेल्स सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमादरम्यान विज्ञानाचे आधुनिक जीवनातील महत्त्व अधोरेखित करण्यात आले. देशाच्या प्रगतीसाठी आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी विज्ञानाचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता संशोधनात्मक वृत्ती जोपासावी, जिज्ञासा वाढवावी आणि नवकल्पना साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन करण्यात आले.

या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रीना देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा व दिशा मिळते. विज्ञान विषयाची भीती दूर होऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो.”

या प्रदर्शनाला पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि मेहनतीचे त्यांनी मनापासून कौतुक केले. एकूणच, राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामुळे शाळेत विज्ञानाबाबत जागरूकता वाढीस लागली असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *