पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) येथे श्रीकाळभैरवनाथ सेवा समिती ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री काळभैरवनाथ उत्सवाला विविध धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांची रंगत लाभणार आहे. गुरुवार (दि. ५ मार्च) पासून रविवार (दि. ८ मार्च) पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष राजाराम कांचन व कार्याध्यक्ष महादेव कांचन यांनी दिली. यावेळी प्रसाद कांचन, प्रताप कांचन, स्वप्निल कांचन, सुनिल तांबे, सचिन कांचन, अनिकेत कांचन, सुरेश कांचन, अभिषेक कांचन, अजिंक्य कांचन, आबासाहेब चव्हाण, अजित जाधव, संतोष गायकवाड, सागर पांगारे, चत्रभुज शेलार, प्रकाश तुपे, गणेश कांबळे, मोहन ताम्हाणे आदी उपस्थित होते.

उत्सवाची सुरुवात गुरुवारी सकाळी ९ वाजता भव्य बैलगाडा शर्यतीने होणार आहे. ही शर्यत सरकारी दवाखान्याशेजारी, जुनी तांबे वस्ती, बाळूमामा मंदिराजवळील मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी रात्री ८ वाजता मारुती मंदिर येथे पारंपरिक भराड कार्यक्रम होणार आहे.

शुक्रवारी (दि. ६ मार्च) सकाळी ८ वाजता महात्मा गांधी विद्यालय येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता महात्मा गांधी विद्यालयाच्या खुल्या रंगमंचावर ‘मराठी लोकधारा रंगयात्रा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे.
शनिवारी (दि. ७ मार्च) सकाळी ६ वाजता हनुमान मंदिरात अभिषेक व भजन स्पर्धा होणार आहेत. त्यानंतर सकाळी १० वाजता रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रात्री ९ वाजता हनुमान मंदिर येथून श्रींच्या पालखीची पारंपरिक मिरवणूक ‘छबिना’ काढण्यात येणार आहे.
रविवारी (दि. ८ मार्च) दुपारी २ वाजता हनुमान मंदिर येथे तोरण तोडण्याचा कार्यक्रम होईल. दुपारी ३ वाजता बाजार मैदानावर निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान रंगणार आहे. सायंकाळी ७ वाजता महात्मा गांधी विद्यालयाच्या खुल्या रंगमंचावर श्री साई निर्मित ‘बेबल्याची घोव’ हे मालवणी हंशावतार नाटक सादर होणार आहे.
नाटकाच्या मध्यंतरात भव्य दिव्य आतषबाजी तसेच उत्सवातील सर्व स्पर्धांचे निकाल व बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे.