
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
उरुळी कांचन : बन्सीलाल पन्नालाल बलदोटा फाउंडेशन, उरुळी कांचन आणि पुण्यातील प्रसिद्ध बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बायफ सीएचआरसी महिला बचत गटासाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ६५ रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली.

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, तसेच आर्थिक अडचणींमुळे आरोग्य तपासणीपासून वंचित राहणाऱ्या महिलांना आणि नागरिकांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून नेत्रविकारांविषयी जनजागृती करण्याबरोबरच वेळेवर नेत्रतपासणी करण्याचे महत्त्वही पटवून देण्यात आले.

या शिबिरासाठी बुधराणी हॉस्पिटलच्या वतीने नेत्रतज्ज्ञ सुमित सर, प्रतीक्षा, कावेरी आणि अस्मिता मॅडम यांनी वैद्यकीय सेवा दिली. त्यांनी उपस्थित रुग्णांची नेत्रतपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, नेत्रविकारांची लक्षणे ओळखून वेळेत उपचार का घ्यावेत, याबाबतही माहिती देण्यात आली.

बन्सीलाल पन्नालाल बलदोटा फाउंडेशनच्या वतीने सुरेंद्र बलदोटा आणि सौ. प्रिया बलदोटा यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले. तसेच बायफ सीएचआरसीच्या वतीने डॉ. लता शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिबिराच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला.
सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी असे उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे. केवळ आर्थिक मदत न करता आरोग्यविषयक सुविधा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा बलदोटा फाउंडेशन आणि बुधराणी हॉस्पिटलचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.

या मोफत नेत्र तपासणी शिबिरामुळे महिला बचत गटातील सदस्यांसह परिसरातील नागरिकांना आरोग्य तपासणीचा लाभ मिळाला. ६५ रुग्णांची तपासणी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने आयोजकांनी समाधान व्यक्त केले.
बापुराव चौधरी उपसंपादक