पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील नामांकित पूनावाला स्टड फार्ममध्ये कर्मचाऱ्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवत चंदनाची झाडे चोरून नेल्याची धाडसी घटना शनिवारी (ता. २८) पहाटे सव्वा चारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याप्रकरणी परमेश्वर हिरामन कोळी (वय ४१, रा. जिल्हा परिषद शाळेमागे, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थेऊर येथील पूनावाला स्टड फार्म देशातील अव्वल दर्जाच्या शर्यतीच्या घोड्यांच्या पैदाशीकरिता ओळखला जातो. येथे उच्च वंशावळीच्या घोड्यांचे संगोपन, प्रशिक्षण आणि प्रजनन केले जाते. या फार्मचे कामकाज पूनावाला ग्रुपकडून पाहिले जाते. देखभाल व दुरुस्तीसाठी येथे सुमारे १० ते १५ कर्मचारी कार्यरत आहेत.

फिर्यादी परमेश्वर कोळी हे या स्टड फार्ममध्ये सुरक्षा पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास चार अनोळखी इसम फार्मच्या प्रवेशद्वाराजवळ आले. सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी सिक्युरिटी गार्ड कुंदन शर्मा, सरजित सिंग आणि इंद्रजित गुप्ता यांना मारहाण केली. तसेच एका सुरक्षा रक्षकाला पकडून ठेवत धारदार शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली.

अचानक घडलेल्या प्रकारामुळे कर्मचारी घाबरले आणि आरोपींना फार्ममध्ये प्रवेश करता आला. त्यानंतर आरोपींनी परिसरातील सुमारे ८० हजार रुपये किमतीची चार चंदनाची झाडे कापली. झाडांचे ओंडके वाहनात टाकून आरोपी तेथून पसार झाले.

पहाटेच्या सुमारास घडलेल्या या धाडसी चोरीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत आहेत.

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *